सातारा : गवा हा बैल कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटामध्ये या प्राण्याचे अस्तित्व आजही टिकून आहे. जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कास, बामणोली खोरे तसेच महाबळेश्वर तालुक्यात या गव्यांचे दर्शन नेहमीच घडते. महाबळेश्वरात शुक्रवारी नजरेस पडलेला हा गवा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरला.
गवा हा नेहमी कळपाने राहतो; परंतु नर गवा बऱ्याचदा एकटा भटकताना दिसतो. महाबळेश्वरात रानगव्यांचा मानवी वस्तीत वावर वाढत चालला असला तरी त्यांना स्थानिक नागरिक इजा पोहोचवत नाहीत. त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करत नाहीत. त्यामुळे गवा देखील कोणताही उपद्रव न करता मुक्तसंचार करताना नेहमीच दिसून येतो.