सातारा : वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका व्हावी व शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या कामातील पहिला टप्पा हा कास भुयारी मार्गाचा असून त्यावरील ३० मीटर लांबीच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच गणेशोत्सवापूर्वी डांबरीकरणाचे काम होऊन पोलीस मुख्यालय पोवई-नाका रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.सातारा शहरातील पोवई नाका हे महत्त्वाचे ठिकाण. येथूनच अनेक दिशांना मार्ग जातात. कोल्हापूर, पंढरपूर, कास, मध्यवर्ती बसस्थानक, पोलीस मुख्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आदी ठिकाणी येथूनच सर्व रस्ते फुटतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. त्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले.
सुमारे ६० कोटी रुपयांचे हे काम असून, संबंधित कंपनीला ते दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. गेल्या पाच महिन्यापासून ग्रेड सेपरेटरच्या कामाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत हे काम सुरू असते. त्यासाठी संबंधित कंपनीच्या मशिनी, अधिकारी, कामगार युद्धपातळीवर काम करू लागले आहेत.या ग्रेड सेपरेटरमधील पहिला टप्पा हा कास भुयारी मार्गाचा आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळून सुरू होणारा हा मार्ग आहे. साधारणपणे ५२० मीटर म्हणजेच सुमारे १७०० फूट या भुयारी मार्गाची लांबी असून रुंदी ७.३ मीटर इतकी असणार आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर कोरेगाव आणि कऱ्हाड मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर आता कास मार्गाचे काम सुरू असून त्यावरील ३० मीटर स्लॅबचे काम झाले आहे.
या स्लॅबवर मुरुम टाकून व डांबरीकरण करुन रस्ता तयार करण्यात येणार आहे. आतापर्यंत मुरुमीकरण झाले आहे. काही दिवसांत खडीकरण व डांबरीकरण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे.