सातारा : महामार्गावरून रात्री अपरात्री अवैध वाहतूक करणाऱ्या बस चालकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकाची धडकी भरली आहे. या पथकाने रात्रीच्या सुमारास कारवाईचा सपाटा सुरू केला असून, शुक्रवारी एका रात्रीत तब्बल १७० खासगी बसेसवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास वायूवेग पथक महामार्गावर तैनात करण्यात आले. वाहनांचा परवाना नसणे, बसच्या टपावर माल वाहतूक करणे, काळ्या काचा लावणे, बसची कागदपत्रे नसणे आदी कारणांमुळे १७० बसेसवर आणि १० कारवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रात्री दहा वाजता सुरू केलेली कारवाई पहाटे पाचपर्यंत सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हे पथक महामार्गावर कारवाई करत आहे. दोन हजारांपासून ४ हजारांपर्यंत प्रत्येक वाहनांना दंड केला जात आहे. जागच्या जागी कारवाई होत असल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.हे वायूवेग पथक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, या पथकामध्ये उपनिरीक्षक बालाजी धनवे, संभाजी गावडे, अफ्रिन मुलाणी, परेश गवासणे, प्रशांत पाटील, समीर सावंत, चालक नीलेश सावंत यांचा समावेश आहे.