सातारा : सात ते आठ गाड्यांचे नुकसान करून नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडवून देणारा जेसीबी घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी भूमिका नुकसानग्रस्त वाहन चालकांनी घेतली आहे. आधी भरपाई द्या..मगच जेसीबी हलवा, अशी मागणी होत आहे.साताऱ्यातील अदालतवाड्याजवळ शुक्रवारी दुपारी जेसीबीने आठ वाहनांचे नुकसान केले तर नऊजण किरकोळ जखमी झाले. या भीषण अपघाताची धग अद्यापही कायम आहे.
रस्त्याकडेला उभ्या केलेल्या कार आणि दुचाकींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. आमचा काही दोष नसताना विनाकारण आम्हाला नुकसान सोसाण्याचे काही कारण नाही, अशी भूमिका नुकसानग्रस्त वाहन धारकांनी घेतली आहे.
अपघात झाल्यापासून जेसीबी त्याच जागेवर आहे. शनिवारी सकाळी काही लोक जेसीबी नेण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना नागरिकांनी आधी भरपाई द्या..मगच इथून जेसीबी हलवा, अशी मागणी केली. त्यामुळे या ठिकाणाहून जेसीबी न नेताच संबंधित लोक निघून गेले.पोलिसांनीही नागरिकांच्या बाजूने सत्काराम भूमिका घेतली असून, संबंधितांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस अधिकाºयांनी सांगितले आहे.दरम्यान, अपघातग्रस्त जेसीबी पाहाण्यासाठी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी गर्दी केली होती. अपघात झाल्यानंतर काही युवकांनी जेसीबीसोबत सेल्फीही घेतला होता. याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या सेल्फीच्या बातमीची चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळत होती. परंतु एवढ्या गर्दीतही कोणीही जेसीबीसोबत सेल्फी घेतला नसल्याने पुढच्याला ठेस.. मागचा शहाणा, याचा प्रत्येक यानिमित्ताने आला.