ठळक मुद्देअजिंक्यताऱ्यांवर जाऊ... पक्ष्यांना खाऊ-पिऊ घालू, पर्यावरणप्रेमींकडून किल्ल्यावर पाणी, खाद्याची सोयचाहूल उन्हाळ्याची
सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर, लांडोर, चिमणी, बुलबुल यासह शेकडो पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकच्या बाटल्या झाडांवर बांधून त्यामध्ये पाणी व खाद्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे किल्ल्यावरील पक्षीही या खाद्याच्या माध्यमातून आपली भूक शमवीत आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या किल्ल्यावर अनेक दुर्मीळ वृक्ष असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत नसल्याने उन्हाळा सुरू होताच मोर, लांडोर व इतर पशुपक्ष्यांचा मानवी वसाहतीत वावर वाढतो. केवळ पाणी व खाद्याच्या शोधार्ध पक्ष्यांची भटकंती सुरू होते. ही भटकंती थांबवण्यिासाठी पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.किल्ल्यावर गेल्या दहा वर्षांपासून मोरांचा सांभाळ करणाऱ्या ललिता केसव (मोरांची आई) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पक्ष्यांच्या पाण्यासाठी पुनर्वापर केला आहे. या बाटल्या झाडांवर बांधण्यात आल्या आहेत.
यामध्ये दररोज पाणी ओतले जाते. तसेच गहू, तांदूळ असे धान्यही पक्ष्यांसाठी टाकले जाते. ललिता केसव यांच्या पर्यावरणपूरक कार्याला नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळत असून, नागरिक व पर्यावरणप्रेमींनी पशुपक्ष्यांसह वृक्ष संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे.