सातारा : निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धावाधाव नको...सगळेच दमतात, उमेदवारी अर्ज दाखल करा..., अशी साद जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना घातली आहे.जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु झाले आहे. जिल्हा आकाराने मोठा आहे. जिल्ह्यात १४९६ ग्रामपंचायती आहेत. साहजिकच राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. त्यात सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश नेहमीच असतो.
मागील टप्प्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आॅनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांनी तहसीलदारांकडे आॅनलाईन अर्जाची प्रिंट व कागदपत्रे द्यावयाची असतात. मात्र ऐनवेळी अर्ज दाखल करुन घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच तहसीलदारांकडे अर्ज दाखलकरण्याची गडबड सुरु केल्याने प्रशासनाची भलतीच पळापळ झाली.अनेकदा शासनाच्या सर्व्हरवरही बंद पडतो. तेव्हा उमेदवारांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येत असतो. सातारा जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र अद्यापही अर्ज भरण्याबाबत उमेदवारांचा अल्प प्रतिसाद मिळतो आहे. दोन दिवस झाले आहेत.उमेदवार ऐनवेळी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गडबड करणार, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेळेत येऊन उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना हे आवाहन करण्याबाबत लेखी सूचना केली आहे.४८ सरपंच व ३८२ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ६ सप्टेंबरअखेर सरपंचपदासाठी अवघे ५ आणि सदस्यपदासाठी अवघे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. स्थानिक राजकारणात रस असणारे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. काही मंडळी नेत्यांचे आदेश येण्याची वाट पाहत असतात.
आदेश होताच मग कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज दाखल करण्याची धावाधाव सुरु होते. अनेकांना ऐनवेळी दाखले मिळत नाहीत, त्यामुळे उमेदवारी अर्जही भरता येत नाहीत. हे नुकसान टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. ५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले गेल्यास संपूर्ण यंत्रणेवर ताण येतो. हे लक्षात घेऊन वेळ आहे तर उमेदवारांनी वाट न पाहत बसता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल