सातारा : शिक्षिकेचा विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील एका शिक्षिकेला वारंवार त्रास देऊन तिच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत धुमाळ यांनी तिच्या शाळेवर सतत भेटी दिल्या होत्या. शाळा तपासणीच्या नावाखाली तिला त्रास दिला जात असल्याचा आरोपही संबंधित शिक्षिकेने केला होता. याबाबत शिक्षिकेने जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी १४ जूनला विशाखा समितीला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तालुका पंचायत समितीच्या विशाखा समितीकडून हालचाल न झाल्याने पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात धुमाळ यांना अटक झाली होती. न्यायालयाने जामिनावर मुक्तता करताच पोलिसांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेने धुमाळ यांना १५ जुलैपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले होते. या संपूर्ण प्रक्रियेचा शासनाकडे याबाबतचा अहवाल पाठवला होता. त्यानुसार धुमाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाचा कार्यकाळ संपल्यावर खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.
...............