सातारा : शीतलहरीमुळे जिल्ह्यात गारठा कायम असून, साताऱ्यात तर यंदाच्या हंगामातील नीचांकी पाऱ्याची नोंद झाली. शनिवारी साताऱ्याचा पारा ११.०७ अंशावर होता. तर रविवारी तापमान वाढून १२.०८ अंशावर पोहोचले.जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. सुरुवातीला हळूहळू किमान तापमानात उतार येत जातो. त्यानंतर डिसेंबरच्या मध्याच्या सुमारास पारा एकदम खालावतो. त्यातच उत्तरेकडे बर्फ पडणे, शीतलहरी सुरू झाल्यानंतर थंडीचा कडाका सुरू होतो. याचा परिणाम सातारा जिल्ह्यातील वातावरणावरही होतो. यंदाच्या हंगामात मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवलीच नाही.जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला, यामुळे ढगाळ वातावरण तयार झालेले. परिणामी किमान तापमान १५ अंशाच्यावर राहिले. डिसेंबरमध्ये फक्त एकदाच १२ अंशापर्यंत तापमान खाली आले; पण त्यानंतर सतत तापमान वाढले होते. मात्र, उत्तरेकडून शीतलहरी आल्यानंतर गारठा वाढला होता. त्यामुळे जानेवारीतही एकदाच साताऱ्याचा पारा १२ अंशापर्यंत खाली आला होता.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कमाल तापमान वाढू लागले आहे. ३२ अंशापर्यंत तापमान पोहोचले असल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवत आहे. त्याचबरोबर तीन दिवसांपासून किमान तापमानात उतार आला आहे. शनिवारी तर सातारा शहरात ११.०७ अंशाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान ठरले.
तर त्याचदिवशी महाबळेश्वरलाही ११.०७ अंशाची नोंद झालेली; पण वेण्णा लेक परिसरातील तापमान एकदम खाली गेल्याने दवबिंदू गोठले होते. हिमकणांची चादर पसरली होती. वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांचे छत, स्ट्रॉबेरी शेतात हिमकणांचा सडा पाहावयास मिळाला.दरम्यान, साताऱ्यात शनिवारी नीचांकी तापमानाची नोंद झाली असली तरी रविवारी मात्र तापमान वाढले होते. १२.०८ अंशाची नोंद झाली होती. तर महाबळेश्वरला १३.०२ अंश तापमान नोंद झाले. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अनेक भागांत शीतलहरीमुळे गारठा जाणवून येत आहे.