रहिमतपूर (सातारा) : येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील ३८ इमारतींमधील काहींना शंभरहून अधिक वर्षे झाले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावले आहे. तसेच तत्काळ इमारतींचा वापर बंद करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील मोडकळीस आलेली घरे पावसाळ्यात पडल्यास घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
संभाव्य दुर्घटना व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने धोकादायक असलेल्या इमारतीत वास्तव्य करणाºया मिळकतदारांना नोटिसा बजावून पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना केली आहे. मात्र पर्यायी निवासस्थान उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने बहुतांशी घरमालक धोका पत्करून धोकादायक घरातच कुटुंबीयांसह वास्तव्य करत आहेत.
गेल्यावर्षी पालिका हद्दीत २५ इमारती धोकादायक ठरवून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यावर्षी धोकादायक इमारतीमध्ये वाढ होवून तब्बल ३८ इमारती धोकादायक असल्याचे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे.