सातारा : दहा दिवसांच्या जल्लोषानंतर सांगता झालेल्या गणेशोत्सवाचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, पर्यावरणपूरक उत्सवाविषयी वाढलेली जागरूकता. साताऱ्यात यावर्षी तब्बल २७०० ते २८०० घरांत शाडूमातीच्या बाप्पांची प्रतिष्ठापना झाली आणि शेकडो नागरिकांनी घरच्या घरी बादलीत विसर्जन केले. सुमारे वीस सार्वजनिक मंडळांनी यावर्षी मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायम ठेवली. शहरातील जलस्रोतांच्या प्रदूषणाचा मुद्दा ‘लोकमत’ने सर्वप्रथम उचलून धरला. सातारा पालिकेनेही यंदा पर्यावरणपूरक उत्सवाला पूरक भूमिका घेतली. मूर्तिकारांसह गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी आधीपासूनच संवाद साधला. ईको-फ्रेन्डली उत्सवासाठी आधीपासूनच कार्यरत असलेल्या संस्था हिरीरीने या मोहिमेत उतरल्या. मूर्तिकार आणि गणेशमूर्तींचे स्टॉलधारक यांना शाडूच्या मूर्ती अधिक संख्येने उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. काही संस्था आणि मंडळांनी स्वत:च नोंदणी करवून घेतली आणि शाडूच्या मूर्तींची एकत्रित मागणी नोंदविली.‘लोकमत’ने मातीच्या मूर्तीच्या धर्मशास्त्रातील महत्त्वापासून प्रबोधन केले. तसेच, याकामी रिंगणात उतरलेल्या संस्था-संघटनांच्या प्रयत्नांना व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. त्यामुळे याविषयी जनमानसात बदल घडण्यास मोठी मदत झाली. अनेकांनी घरच्या घरी बादलीत किंवा हौदात शाडूच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरविले होते. त्याची उत्तम अंमलबजावणी होऊन अनेकांनी विसर्जनानंतर तुळशीला किंवा अंगणातील झाडांना ते पाणी घातले.पालिकेने यावर्षी फक्त शाडूच्याच मूर्ती आणणाऱ्या स्टॉलधारकांना मोफत जागा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेचीही अंमलबजावणी झाल्याने शाडूमूर्तींची संख्या यंदा कितीतरी पटींनी वाढली. शाळकरी मुलांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची शिबिरे काही संस्थांनी घेतली. लहानग्यांनी हाताने बनविलेल्या मूर्तींची अनेक घरांत प्रतिष्ठापनाही झाली. पालिकेने गोडोली येथे खास विसर्जन तलाव तयार केला होता. हजारो मूर्तींचे विसर्जन या तलावात करण्यात आले. सर्वच बाजूंनी प्रबोधन आणि कृतिकार्यक्रम राबविला गेल्याने मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळून, यापुढील काळात पर्यावरणाचे जतन करण्याच्या प्रयत्नांत लोकसहभाग वाढण्याची सुचिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)यंदा ‘लोकमत’च्या माध्यमातून शाडूचा गणपती बसविण्याचे प्रबोधन झाले. त्यामुळे आम्ही घरात शाडूचा गणपती बसविला आणि विसर्जनही पाण्याच्या मोठ्या बादलीत केले. मूर्ती विरघळल्यानंतर त्याचे हे पाणी घरासमोरील बागेत प्रत्येक झाडाला घातले. - राजश्री केळुस्कर, सातारावर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी-परंपरांमध्ये बदल करणे सोपे नसते. त्याला अनेकदा घरातील ज्येष्ठांचा विरोध राहतो. यंदा ‘लोकमत’मुळे आम्ही मूर्ती लहान आणि शाडूची आणली. तिचे विसर्जनही घरीच केले. आमच्यातील हा बदल ‘लोकमत’ मुळेच झाला.- संजना जाधव, गोळीबार मैदानधर्मशास्त्र आणि आधुनिकता यातील तफावत ‘लोकमत’मधील वृत्तमालिकांमुळे पुढे आली. त्यामुळे पारंपरिक पध्दतीनुसार आम्ही मातीचा गणपती बसवला होता. या गणपतीचे विसर्जन आम्ही पालिकेने सोय केलेल्या हौदात केले. याचे श्रेय ‘लोकमत’ला जाते.- हरिविजय बाबर, पंताचा गोट
सातारा : तब्बल २ हजार ८०० घरांत शाडूच्या मूर्ती----लोकमत इनिशिएटिव्ह
By admin | Published: September 09, 2014 10:43 PM