मलकापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात आणण्यासाठी घरोघरी स्वच्छतेचाच पाठ वाचला जात आहे.मलकापूर शहराने स्वच्छतेबाबत सातत्याने विविध पर्याय करत सध्या देशातील मोजक्याच शहरात आपले स्थान प्राप्त केले आहे. नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने विशेष नियोजन केले असून, शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी ९ घंटागाड्या सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये ५ नवीन घंटागाड्यांचा समावेश आहे.
घराघरातील महिलाही ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीतच देत आहेत. त्यासाठी शहरातील १० हजार घरांत प्रत्येकी दोन बकेटप्रमाणे २० हजार बकेटचे वाटप केले आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प ८ जुलै २०१७ पासून कार्यान्वित केला आहे.स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शहरातील १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १४ खासगी विद्यालये, महाविद्यालये, २२ अंगणवाड्या यांचा सामावेश केला आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले आहे. या अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:साठीच स्वच्छता करायची आहे.
हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. नगरपंचायत स्तरावरील राज्यातील पहिलीच भुयारी सांडपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छता अभियान ही स्पर्धा नव्हे तर एक चळवळ म्हणून त्याकडे मलकापूरवासीयांनी लक्ष केंद्रित केले आहे.