सातारा : निसराळे येथे सावडण्याच्या विधी कार्यक्रमात जेवण केल्यानंतर अठरा महिलांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.सातारा तालुक्यातील निसराळे येथील किसन गायकवाड (वय ५०) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा माती सावडण्याचा विधी कार्यक्रम असल्याने भावकी व नातेवाईक मंगळवारी निसराळे येथे जमले होते.
पुरुष मंडळीचे जेवण झाल्यानंतर महिला जेवणास बसल्या होत्या. त्यावेळी भावकीतून प्रत्येक घरातून आलेली भाकरी व आमटी एकत्र करून सर्व महिलांनी खाल्ल्या. त्यामुळे महिलांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. सायंकाळी त्या १८ महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दरम्यान, नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी निसराळे येथे येऊन ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिले आहेत.