पाचगणी : केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली.महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत खरंच पोहोचल्या आहेत का? या उद्देशाने केंद्रीय मूल्यांकन कमिटीने आरोग्यसेवेत अग्रेसर असलेल्या सातारा जिल्ह्याची निवड केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांना भेटी देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या आरोग्य सेवांचे मूल्यमापन या केंद्रीय पथकाच्या वतीने करण्यात आले. या पथकाचे प्रमुख डॉ. हिमांशू राय हे असून, यामध्ये डॉ. माथूर, डॉ. शेळके सहभागी झाले होते. तसेच चाळीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.करहरमध्ये या पथकाने प्रवेश केल्यानंतर घरोघरी जाऊन लाभार्थी व रुग्णांशी थेट संवाद साधण्यात आला. शासनाच्याच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतात का? हे पाहण्यासाठी घरोघरी विचारपूस करण्यात आली.तसेच गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंचांशीही संवाद साधण्यात आला. एकंदरीत केंद्र शासनाच्या या पथकास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. हातगेघर येथील उपकेंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रासही भेट देण्यात आली. यावेळी डॉ. संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, डॉ. बिलोलीकर, डॉ. राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. मोहिते, डॉ. रासकर, डॉ. अमर शेलार, डॉ. प्रिया गोळे, गट प्रवर्तक परामणे तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी विशेष प्रयत्न केले.