सातारा : सातारा सिंचन मंडळाने २०२३-२४ वर्षात टंचाई परिस्थिती असतानाही विक्रमी २२ कोटी ८८ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुली केली आहे. यासाठी विविध विभागांचे सहकार्य लाभले तर, मंडळामार्फत यापूर्वी १९ कोटी ४१ लाख रुपयांची सर्वाधिक पाणीपट्टी वसुली करण्यात आली होती.सातारा सिंचन मंडळाकडे सातारा जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाची आणि देखभाल-दुरुस्तीची कामे आहेत तर, या मंडळाकडे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी व कोयना हे पाच मोठे प्रकल्प आहेत. तसेच येरळवाडी, राणंद, नेर आणि आंधळी हे चार मध्यम प्रकल्प व २८ लघु प्रकल्प आणि ६४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सिंचन व्यवस्थापनासाठी आहेत. त्यातच जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सातारा सिंचन मंडळाने पाणीपट्टी वसुलीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२३-२४ वर्षात २२ कोटी ८८ लाख रुपयांची वसुली झालेली आहे.या विक्रमी पाणीपट्टी वसुलीबाबत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी लाभक्षेत्रातील बागायतदार, कालवा पाणी वापर संस्था, सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वाई, सातारा, तासवडे (कऱ्हाड) व लघु औद्योगिक वसाहत पाटण, सातारचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा नगरपालिका आदींचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत, तसेच मंडळांतर्गत सर्व विभागांतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सिंचन व्यवस्थापनातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे काैतुक केले आहे.
सातारा सिंचन मंडळाची २३ कोटींची विक्रमी पाणीपट्टी वसुली
By सचिन काकडे | Published: April 04, 2024 6:24 PM