सातारा : मुंबईहून साताऱ्यात नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७३ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सातारा बसस्थानकात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमिता रत्नाकर आटपाडकर (वय ४५, रा. एरोली, नवी मुंबई) या बुधवारी त्यांच्या आईसोबत साताऱ्यांत नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्या मुंबईला जाण्यासाठी आईसोबत बसस्थानकात आल्या. यावेळी त्यांच्या आईजवळ असलेल्या पिशवीतील डब्यात दागिने आणि रोकड ठेवली होती.
दोघीही चालत रिक्षा थांब्याकडे जात असताना तेथे दोन महिला आल्या. त्या महिलांनी बोलण्याचा बहाणा करत पर्समधील दागिन्यांचा डबा हातोहात लांबविला. डब्यामध्ये मंगळसूत्र, टॉप्स, तोडे यासह १७ हजारांची रोकड होती.
दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर आटपाडकर यांनी बसस्थानकातील पोलीस चौकीमध्ये जाऊन याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बसस्थानकात सगळीकडे संबंधित महिलांचा शोध घेतला. मात्र, त्या महिला सापडल्या नाहीत.सीसीटीव्हीत कैद...चोरी करणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. मात्र, त्यांनी तोंडाला स्कार्प बांधल्यामुळे त्यांची ओळख कशी पटवायची, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.