पाचवड : कुंभारवाडी (आसले), ता. वाई येथील विवाहितेचा हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावून जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याच्या विरोधात भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुंभारवाडी येथील देवदत्त प्रताप मोरे याच्याशी मे २०१७ मध्ये संबंधित विवाहितेचे लग्न झाले होते. दरम्यान पती देवदत्त मोरे, सासरा प्रताप मोरे, सासू बेबी मोरे यांनी संबंधित विवाहितेजवळ गावी असलेल्या वडिलोपार्जित घरी येऊन हॉटेल सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.
मुंबईहून गावी आल्यावर बंद असलेले हॉटेल सुरू करणे व त्यावरील कर्ज भरण्यासाठी विवाहितेला माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. तसेच जाचहाट सुरू करण्यात आला. त्यामुळे संबंधित विवाहितेने तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये जाचहाटाचे कारण स्पष्ट केले आहे. भुर्इंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे तपास करीत आहेत.