लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातील सर्वाधिक ४५१ तर त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यातील ३३७ ठराव दाखल झालेले आहेत. एकूण मतदानाच्या तब्बल ७८८ मतदान या दोन तालुक्यांमध्ये असल्याने जिल्हा बँकेत हे दोन तालुकेच बाजीगर ठरणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध संस्थांचे २०१३ ठराव दाखल झाले आहेत. विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सर्वात जास्त ९६४ ठराव आलेले आहेत. बँकेच्या निवडणुकीसाठी विकास सोसायटी, नागरी बँका व पतसंस्था, गृहनिर्माण, औद्योगिक विणकर, खरेदी-विक्री संघ, प्रक्रिया उद्योग असे सहा मतदारसंघ आहेत. जिल्हा बँकेसाठी २१ संचालक निवडायचे आहेत. त्यामध्ये सोसायटी मतदारसंघातून ११ संचालक निवडले जाणार आहेत. सोसायटी मतदारसंघासाठी प्रत्येक तालुक्यातील सोसायट्यांचे मतदार मतदान करतील.
इतर जे चार मतदारसंघ आहेत, त्यांची कक्षा ही संपूर्ण जिल्हाभर आहे. सोसायटी मतदारसंघ वगळता इतर पाच मतदारसंघ तसेच दोन महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त हे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी जिल्ह्यातील २०१३ मतदार मतदान करणार आहेत. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघातील मतदारांना आपल्या मतदारसंघासोबतच महिला प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती या प्रवर्गातील संचालकांना निवडून देण्याचा अधिकार राहणार आहे.
दरम्यान, सातारा, कऱ्हाड, फलटण या तीन तालुक्यांचे मतदान निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. कृषी प्रक्रिया मतदारसंघासाठी शिवरुपराजे खर्डेकर यांना उमेदवारी मिळण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आग्रही आहेत. तर तालुक्यांच्या सोसायटी मतदारसंघातील उमेदवारीवरुन देखील विद्यमान संचालक मंडळामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
सध्या असे आहेत संचालक
विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुनील माने, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, विलासकाका पाटील-उंडाळकर (निधनामुळे रिक्त), मकरंद पाटील (खरेदी-विक्री संघ), शिवरुपराजे खर्डेकर (कृषी उत्पादन, प्रक्रिया), राजेश वाठारकर (नागरी बँका, पतसंस्था), उदयनराजे भोसले (गृहनिर्माण), अनिल देसाई (औद्योगिक विणकर), सुरेखा पाटील (महिला प्रतिनिधी), कांचन साळुंखे (महिला प्रतिनिधी), प्रकाश बडेकर (अनुसूचित जाती), प्रदीप विधाते (इतर मागास), अर्जुनराव खाडे (भटक्या विमुक्त) हे संचालक प्रतिनिधीत्व करत आहेत.
ठरावांच्या छाननीसाठी तीन दिवसांची मुदत
जिल्हा बँकेकडे जमा झालेले ठराव जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासले जाणार आहेत. त्यामध्ये संबंधित संस्था क्रियाशील आहे का?, बँकेकडून कर्ज घेतले आहे का?, बँकेच्या सभेला उपस्थित होते का? याबाबी तपासल्या जाणार आहेत. ही तपासणी तीन दिवस चालेल त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी तपासणी केलेले ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत.
असे आहेत ठराव
सातारा : सोसायटी १४६, नागरी बँका, पतसंस्था ९४, गृहनिर्माण १२२, औद्योगिक विणकर ७९, खरेदी-विक्री संघ २, प्रक्रिया उद्योग ८
कऱ्हाड : सोसायटी १४५, नागरी बँका ७१, गृहनिर्माण ६७, औद्योगिक विणकर ४८, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया उद्योग ५
वाई : सोसायटी ५९, नागरी बँका ७१, गृहनिर्माण १५, औद्योगिक विणकर २४, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया २
पाटण : सोसायटी १0५, नागरी बँका २९, गृहनिर्माण ४५, औद्योगिक ३२, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया १
महाबळेश्वर : सोसायटी ११, नागरी बँका १४, गृहनिर्माण १४, औद्योगिक ९, खरेदी-विक्री संघ ०, प्रक्रिया १
जावळी : सोसायटी ५१, नागरी बँका ७, गृहनिर्माण ३, औद्योगिक ८, खरेदी विक्री संघ १, प्रक्रिया २
खटाव : सोसायटी १०३, नागरी बँका १८, गृहनिर्माण ४, औद्योगिक २३, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया १
माण : सोसायटी ७४, नागरी बँका २४, गृहनिर्माण ४, औद्योगिक १६, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया ०
कोरेगाव : सोसायटी ९०, नागरी बँका २१, गृहनिर्माण ९, औद्योगिक १०, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया ०
खंडाळा : सोसायटी ५१, नागरी बँका १५, गृहनिर्माण ९, औद्योगिक १२, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया १
फलटण : सोसायटी १२९, नागरी बँका ५७, गृहनिर्माण १५, औद्योगिक ६०, खरेदी-विक्री संघ १, प्रक्रिया ८
एकूण : २०१३
जिल्हा बँक निवडणूक लोगो आणि फोटो वापरावा