- नितीन काळेल सातारा - भूजल समृध्द ग्राम स्पर्धेत सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील किरकसालने प्रथम क्रमांक पटकावला. तर खटावमधील निढळ आणि मांडवे ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतिय क्रमांक मिळवला. या गावांना ५०, ३० आणि २० लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी की, शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविण्यात येते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी गावा-गावांत सुदृढ स्पर्धा निर्माण होण्याच्यादृष्टीने आणि अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
२०२२-२३ वर्षासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या १३ जिल्ह्यातील २७० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आलेली. स्पर्धेत सातारा जिल्हास्तरावर माण तालुक्यातील किरकसाल ग्रामपंचायत प्रथम आली आहे. तर खटाव तालुक्यातील निढळ ग्रामपंचायत द्वितीय आणि मांडवे ग्रामपंचायतीचा तृतीय क्रमांक आला आहे. या ग्रामपंचायतींना बक्षीस मिळणार आहे, असे सातारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.