सातारा : शहरातील मंगळवार पेठेत जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यांवर आता डांबर पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेले हे खड्डे मुजविण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी लागला हे विशेष आहे.सातारा शहरातील मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात तीन आठवड्यांपूर्वी जलवाहिनीची गळती काढण्यासाठी दोन ठिकाणी खड्डे काढण्यात आले होते.
हे खड्डे काढण्यासाठीही आठ दिवसांचा कालावधी लागला होता. येथील गळती काढल्यानंतर हे खड्डे दगड आणि मातीने मुजवण्यिात आले होते. पण, त्यावर डांबर टाकले नव्हते. त्यामुळे खड्ड्यांवरील दगड आणि माती रस्त्यात विखुरली होती.
परिणामी अपघाताची भीती व्यक्त होती. हे खड्डे डांबराने मुजवावेत अशी मागणी होत होती. त्यानंतर संबंधितांनी याकडे लक्ष देत बुधवारी सायंकाळच्या सुमारास येथील दोन खड्डे डांबराने मुजविले. यामुळे अपघाताचा धोका टळला असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.