वाठार स्टेशन (सातारा) : वाठार स्टेशन परिसरात जोमात चाललेल्या अवैध दारू, मटका व्यवसायामुळे लागलेला बदनामीचा डाग पुसण्यासाठी वाठार स्टेशन पोलिसांनी कंबर कसली. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकण्याचा निर्णय घेतला; पण छापे पडण्यापूर्वीच तेथील मुद्देमाल गायब झाला.याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी छापा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नियोजन केले. दिवस ठरला, पथक तयार केले. पोलीस ठाण्यातून गाडी नियोजित जागेकडे धावू लागली; परंतु ही माहिती नेहमीप्रमाणे अवैध व्यावसायिकांना मिळाली. छापा टाकण्यापूर्वीच सर्व ऐवज गायब झाला. छाप्याची माहिती संबंधितांना समजलीच कशी, याचं कोडं अधिकाऱ्यानाही पडलं असावं.कोरेगाव तालुक्यातील ४७ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाठार पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी नवे अधिकारी दाखल झाले. दरम्यानच्या काळात अवैध व्यवसायाने जोर धरला. भुरट्या चोऱ्याही वाढल्या. पंधरा दिवसांत तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. बाजारपेठेतून मोबाईल, पाकीटमारीचे सत्र सुरूच आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन अधिकाऱ्यांनी छापा टाकण्याचे नियोजन केले. मात्र, तत्पूर्वीच सर्व ऐवज गायब झाल्याने तो फोल ठरला. वाठार स्टेशन, अंबवडे आणि पिंपोडे बुद्रुक ही मोठ्या बाजारपेठेची ठिकाणे आहेत. या ठिकाणी जुगार, मटका, दारू व्यवसाय, भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी देऊर येथील अवैध दारू व्यावसायिकावर आम्ही छापा टाकला होता. मात्र, यावेळी त्याच्याकडं मुद्देमाल आढळून आला नाही. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.- मारुती खेडकरसहायक पोलीस निरीक्षक,वाठार स्टेशन