सातारा: सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने ठाकली आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.अशी सगळी राजकीय परिस्थिती असतानाही शनिवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ.अतुल भोसले कराडात एकत्रित दिसले. आता त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खरंतर १४ एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस म्हणून ओळखला जातो. कराडात प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साह मध्ये साजरी केली जाते. यंदाही ही जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. शनिवारी रात्री १२ वाजताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.
महामानवांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे नेते डाँ. अतुल भोसले रात्री ११:३० च्या सुमारास तेथे पोहोचले होते. तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे ११:४५ च्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यावेळी भोसले व शिंदे दोघेही एकत्रित आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार करत हस्तांदोलन केले.
खरंतर बरोबर १२ वाजता प्रार्थना व त्यानंतर पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम प्रथेप्रमाणे होत असतो. त्यामुळे थोडा वेळ वाट पाहणे क्रमप्राप्त होते. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या शशिकांत शिंदे व डॉ. भोसले यांच्यात उभे राहूनच चर्चा सुरू झाल्या. मात्र आजूबाजूला सुरू असणाऱ्या वाद्यांच्या गजारामुळे त्या दोघांच्यात नेमकी काय बोलणे झाले हे मात्र कोणालाच कळाले नाही.
प्रार्थना झाल्यानंतर शशिकांत शिंदे व डॉ. भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शशिकांत शिंदे हे तेथे लेझीम खेळणाऱ्या पथकाकडे गेले व स्वतः हातात लेझीम घेऊन त्यांनी हलगी आणि घुमक्याच्या तालावरती काही वेळ ठेका धरला. पण या सगळ्यात शिंदे व भोसले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी ? याचीच चर्चा सुरू आहे.