सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने प्रमुख धरणात सद्य:स्थितीत ९६ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा आहे. तर कोयनेसह महाबळेश्वर आणि नवजा येथे पाच हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. पश्चिम भागासह पूर्व भागातही पाऊस बरसला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांनंतर पावसाने पुन्हा दडी मारली.
याचा फटका दुष्काळी तालुक्यात बसला. मात्र, पश्चिम भागात जुलै महिन्यापासून पाऊस सुरू झाला तो सतत दीड महिने पडत होता. यातील सुमारे एक महिन्याचा काळ हा संततधार पावसाचा होता. यामुळे पश्चिम भागातील पिके वाया जाणार की काय अशी स्थिती होती. तर पूर्व भाागात अद्यापपर्यंत तरी पावसाने कायमच उघडीप दिली आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका वाढला आहे.पश्चिम भागात सतत पाऊस झाल्याने कोयना, उरमोडी, तारळी, कण्हेर, धोम, बलकवडी ही धरणे वेळेपूर्वीच भरली आहेत. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले. सध्याही कोयनेसह बलकवडी, धोम, कण्हेर आदी धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.पश्चिम भागात सध्या पावसाने उघडीप दिली असलीतरी धरणात पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात शनिवारी सकाळपर्यंत १०४.६१ टीएमसी पाणीसाठा होता. तर पाण्याची ही टक्केवारी ९९.१९ आहे. धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले असून, त्यातून ३,१२६ तर पायथा वीजगृहातून २,१०० असा मिळून ५,२२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धोम धरण ९६.३८ टक्के भरले असून पाणीसाठा १३.०५ टीएमसी इतका आहे. कण्हेरमध्ये ९.७२ टीएमसी साठा असून, धरण ९६.२५ टीएमसी भरले आहे. या धरणातून ५७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडीत ९.७७ टीएमसी साठा असून धरण ९८.०५ टक्के भरले आहे. तारळी धरणात ५.४६ टीएमसी साठा आहे. तर धरण ९३.४५ टक्के भरले आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
- धोम ०१ ६२९
- कोयना ०९ ५२५९
- बलकवडी ११ २७३५
- कण्हेर ०० ७२४
- उरमोडी ०२ १२५४
- तारळी ०२ २२३१