प्रगती जाधव पाटील
सातारा : नेहमीच महिला आपल्या आणि इतरांच्या कुटुंबीयांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी घेतात. त्यासाठी स्वत: श्रमतात. म्हणूनच खास महिलांच्या सन्मानासाठी या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रोजा सोडतानाची इफ्तारचा खाना मुक्तांगणच्या प्रांगणात आयोजित केला होता. सुमारे अडीचशेहून अधिक महिलांनी यावेळी सहभोजनाचा आस्वाद घेत हिंदु मुस्लिम ऐक्याचा संदेशही दिला.
हिंदू-मुस्लिम-बौद्ध-जैन-पारशी-ख्रिश्चन अशा विविध धर्माच्या जातीच्या महिलांचे इथे मुक्त संमेलनच होते. ‘मुक्तांगण’चा परिसर रोशणाई करून, पताका लावून सजवण्यात आला होता. फळफळावळ उपवास सोडण्यासाठी तयार ठेवली होती. खजूर तर होतेच. सरबतही होते. इफ्तारच्या वेळेआधी ‘राम बोलो भाई राम’ ही हृदयस्पर्शी फिल्म दाखवण्यात आली. त्यानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहाने रोजा सोडण्यात आला.