नितीन काळेलसातारा : वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल झाले आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्यामुळे नगदी उन्हाळी पिके घेतल्याने दुष्काळी भागातील अनेक शेतकरी खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले आहेत. ४५ दिवसांचं श्रमदान गावांना पाणीदार करुन गेले आहे.राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमिर खानच्या पाणी फौंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी माण तालुक्यातील ६६ गावे स्पर्धेत उतरली होती.
या सर्व गावात जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. तर काही गावांनी उद्दिष्टापेक्षा अधिक काम केले आहे. याचा दृश्य परिणाम म्हणजे पाणीसाठा वाढला आहे. यावर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावली. माण तालुक्याच्या काही भागात हा पाऊस चांगला झाला. त्यामुळे भांडवली, थदाळे, किरकसाल, श्री पालवन, अनभुलेवाडी, पिंगळी खुर्द भागात पाणी साठले. पाझर तलाव, नालाबांध भरले. तर माळरानावरील सीसीटी, डीपसीसीटी भरल्याने परिसर आबादानी झाला.
बनगरवाडीसारख्या गावातील शेततलाव, नालाबांध भरल्याने ओढ्याला पाणी वाहू लागले. परिणामी विहिरींची पातळी वाढल्याने पिकांना शाश्वत पाणी मिळू लागलं आहे. तसेच उन्हाळ्यातही पिकांना पाणी मिळणार आहे.
गेल्यावर्षी स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे झाल्याने पावसाळ्यात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे कारखेल, थदाळे, बिदाल, किरकसाल, पिंगळी खुर्द, काळेवाडी, जाशी, दिवडी आदी गावांत यावर्षी उन्हाळ्यात टँकरही फिरकला नाही. या गावांनी पाणीसाठा केल्याने हे चित्र यंदा प्रथमच दिसले.कांदा, वाटाणा, डाळिंब, कलिंगडातून ५० कोटीपर्यंत उड्डाण !जलसंधारणामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यावर कांदा, वाटाणा, कलिंगड, ऊस, पालेभाज्या, डाळिंब आदी घेण्यात येत आहे. त्यामुळे बिदाल, थदाळे, कारखेल, किरकसाल, परकंदी आदी गावांतून सुमारे ५० कोटीपर्यंत शेती उत्पादन निघाले आहे.
बिदालमध्ये तर सुमारे १५ कोटी रुपयांचा कांदा विकण्यात आला असून अद्यापही २० ते २५ कोटी रुपयांचा कांदा शिल्लक आहे. तर परकंदीत वाटाण, कांद्यातून दीड ते दोन कोटी रुपये शेतकऱ्यांनी मिळवले आहेत. कारखेलला डाळिंब, कलिंगडातून ३ कोटींवर उत्पन्न मिळाले आहे.