सातारा : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे मंगळवारपासून कडक लॉकडाऊन असणार आहे. दुकाने, भाजीपाला पूर्ण बंद असणार आहे. तर पंपावरही अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. त्यामुळे रविवारी साताऱ्यात खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. काहींनी भाज्या खरेदी केल्या तर किराणा दुकानदारांना अनेकांनी चिठ्ठी देऊन नंतर साहित्य नेले. तसेच पंपावरही अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्याचे दिसून आले.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक तीव्र होत चालली आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत ३४२५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. सुरुवातीला काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर बाधित संख्या कमी होत नसल्याने आणखी काही निर्बंध घातले. या निर्बंधांना महिना होत आला तरी अजूनही बाधित कमी होत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मेच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.
या नवीन निर्बंधामुळे एक जूनपर्यंत व्यापारी तसेच इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपाहारगृहे, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, भाजी व फळ मार्केट, मंडई, फेरीवाले, वाईन शॉप, देशी दारू दुकाने, मांस विक्री दुकाने, कृषी बाजार समिती अंतर्गत सर्व व्यवहार, बेकरी, वाहन दुरुस्ती, रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या सेवा, वित्तीय बाजार, बांधकामे आणि राज्य परिवहन महामंडळाची जिल्हांतर्गत वाहतूक सेवाही पूर्ण बंद राहणार आहे. फक्त रुग्णालये, निदान केंद्र, औषध कंपन्या व दुकाने सुरू राहतील. तसेच दूध संकलन केंद्र सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरू राहणार असून घरपोच दूध वितरणाला परवानगी आहे. तसेच पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन मिळणार आहे.
जिल्ह्यात मंगळवारपासून कडक निर्बंध लागू होत असल्याने रविवारी सातारा शहरात अनेक नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजार समितीत तर व्यापाऱ्यांसह स्थानिक अनेक नागरिकांनी भाजी खरेदी केली. तर सध्या किराणा दुकानदारांना घरपोच सेवा आहे. तीही बंद होणार असल्याने अनेक नागरिकांनी आडबाजूच्या दुकानात जाऊन किराणा माल खरेदी केला. तसेच अनेकांनी दुकानदारांना साहित्याची चिठ्ठी देऊन मालाचे पॅकिंग झाल्यानंतर तो नेला. शहरातील पंपावरही वाहनधारकांनी गर्दी केली होती. अनेकांनी दुचाकीसारख्या वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्याचे दिसून आले.
............................