सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवर पुुन्हा एकदा वेळेचे बंधन घातले आहे. नव्या नियमावलीनुसार बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, साताऱ्यात रात्री नऊनंतरही बहुतांश दुकाने सुरू ठेवली जात आहेत. कोरोनाचे दुकानदार व विक्रेत्यांना तसूभरही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा ठोस पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यातील निवासी वगळता इतर सर्व पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्यातील नागरिकांच्या उपस्थितीवरही निर्बंध घालण्यात आले आहे. याचबरोबरच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवरही वेळेचे बंधन घातले असून, सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, शहरातील बहुतांश व्यापारी, दुकानदार, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपºया तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जुमानला जात नाही.
रात्री नऊनंतरही शहरातील बसस्थानक परिसर, पोवई नाका, राजपथ, राजवाडा, मोती चौक, खणआळी, ५०१ पाटी, रविवार पेठ आदी ठिकाणची अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जातात. काही दुकाने तर बाहेरून बंद व आतून मात्र सुरू असतात. ग्राहक आल्यास दुकानाचे शटर उघडले जाते व ग्राहक गेला की शटर बंद होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात असताना नागरिकांसह दुकानदार व व्यापाऱ्यांना याचे कोणतेच गांभीर्य नाही. शासन नियमांचे पालन न केल्यास प्रशासनापुढे लॉकडाऊनशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही, या गोष्टीचा सातारकरांनी विचार करायला हवा.
(चौकट)
पालिका कारवाई करणार कधी?
सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी दुकानात एका वेळी केवळ पाच नागरिकांना प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, शहरातील एकाही दुकानदार व व्यापाऱ्यांकडून या आदेशाचे पालन केले जात नाही. सोशल डिस्टन्सचा सातत्याने फज्जा उडत असून, ही बाब कोरोनावाढीसाठी कारणीभूूत ठरू शकते. नागरिकांसह दुकानदारांवर अंकुश लावण्यासाठी आता पालिका प्रशासनानेच दंडात्मक कारवाई सुरू करणे गरजेचे बनले आहे.
फोटो : जावेद खान
लोगो : रिॲलिटी चेक