कऱ्हाड : प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला.
यावेळी डॉक्टर व नातेवाइकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.रविना आकाश माने (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील रविना यांचा कोळे येथील आकाश माने यांच्याशी डिसेंबर २०१६ मध्ये विवाह झाला होता.
रविना या गर्भवती असल्यामुळे गत काही महिन्यांपासून कुटुंबीय त्यांची चांगली काळजी घेत होते. दरम्यान, शनिवारी रात्री प्रसूतीसाठी रविना यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. त्यांनी मुलीला जन्म दिला.मुलीच्या जन्मामुळे कुटुंबीय आनंदीत असतानाच रविना यांची प्रकृती बिघडली. बाळाची प्रकृती चांगली असतानाही रविना यांची तब्बेत खालावल्यामुळे नातेवाईक घाबरले. त्यानंतर रविना यांना अधिक उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी योग्य उपचार आणि देखभाल केली नसल्यामुळे रविना यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. यावेळी शाब्दिक चकमक उडाली.तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने कऱ्हाड शहर तसेच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन नातेवाइकांना दिले. त्यामुळे तणाव निवळला.