- संतोष खरातलोणंद - नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाऊ...आमि दहिवाचे दहिवाचे, दास पंढरीरायाचे...टाळ वीणा घेऊनि हाती, केशवराज गाऊ किती...ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांच्या मेळ्याने रविवारी लोणंदनगरीत प्रवेश करताच संपूर्ण परिसर टाळ-मृदंग आणि माउली नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
सातशे वर्षांची अखंडपणे चालत आलेली वारीची परंपरा, विठुराया चरणी समर्पित करण्यासाठी वारकरी आळंदीहून पंढरीकडे निघाले आहेत. या वारीचा सातारा जिल्ह्यातील माउलींचा हा पहिला मुक्काम लोणंद येथे आहे. पालखी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी तळावर विसावली आहे. दुपारी दोन वाजता माउलींच्या टाळ-मृदंगांचा निनाद अन् ज्ञानोबा माउली तुकारामाचा अखंड जयघोष करत माउलींच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, तहसीलदार अनिल पाटील, पुरुषोत्तम जाधव, विराज शिंदे, आनंदराव शेळके-पाटील यांनी स्वागत केले.
माउलींचे जिल्ह्यात आगमन होताच फुलांचा वर्षाव माउलींच्या रथावर करण्यात आला. पाचशेहून अधिक छोट्या-मोठ्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे पंचवीस आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे पाचशेहून अधिक दिंड्या आणि इतरही शेकडो दिंड्या वारीत सहभागी झाल्या आहेत.
दत्त घाट निरा येथे माउलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर पालखी सोहळ्याचे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात केले. त्यानंतर पालखी लोणंद शहराकडे मार्गस्थ झाली. श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा लोणंदनगरीत दाखल होताच लोणंदच्या नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, नगरसेवक भरत शेळके, भरत बोडरे, रवींद्र क्षीरसागर, गणीभाई कच्ची, सचिन शेळके- पाटील, सागर शेळके, असगर इनामदार, वैभव खरात, गणेश शेळके यांच्या उपस्थितीत स्वागत केले.
डोक्यावर मोरपिसारा असलेली टोपी घातलेल्या वासुदेवांची हाळी सुरू होती. भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी आनंदाने फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी लोकांची गर्दी दिसून येत होती. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून माउलींचे स्वागत करण्यात येत होते. फुलांचा वर्षाव करून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.