सातारा : उदयनराजे-अजित पवारांमधील मौन सुटले, दूरध्वनीवरून संभाषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:13 PM2018-02-06T18:13:58+5:302018-02-06T18:17:21+5:30
खासदार उदयनराजे भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मौन अखेर सुटले. खासदार उदयनराजेंनी २४ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले. दोघांनी दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधल्याची जोरदार चर्चा असून, मौन सुटले तर वैर सुटणार का? याची उत्सुकता समस्त सातारवासीयांना लागून राहिली आहे.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मौन अखेर सुटले. खासदार उदयनराजेंनी २४ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले. दोघांनी दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधल्याची जोरदार चर्चा असून, मौन सुटले तर वैर सुटणार का? याची उत्सुकता समस्त सातारवासीयांना लागून राहिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वेगळीच रणनिती आखला आहे. सर्वपक्षीयांना त्यांनी वाढदिवसाचे आवतण धाडले आहे. अनेकांशी ते जातीने फोनवरून संभाषण साधत आहेत. अजित पवार यांच्याशी त्यांनी संभाषण साधल्याने एक वेगळेच वातावरण तयार झाले.
राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया उदयनराजेंनी साधली आहे.
सातारकरांच्या जिव्हाळ्याची आणि बरेच वर्षे रखडलेल्या कामांना मुहूर्ताने मार्गी लावण्याचे उदयनराजेंनी ठरविले आहे. कास तलावाची उंची वाढविणे, भुयारी गटार योजनेचा प्रारंभ, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर, सातारा पालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा वाढदिवस थाटात साजरा करण्यासाठी उदयनराजेंच्या मावळ्यांनी उचल खाल्ली आहे.