मायणी : मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात मायणी ग्रामपंचायत यशस्वी झाल्याने यावर्षी प्रथमच मायणीकरांना टँकरमुक्त उन्हाळ्याचा आनंद मिळणार आहे. मायणीकरांसाठी ही गुड न्यूजच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिना सुरू झाला की ग्रामपंचायतीमार्फत टँकर मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून गावातील नळपाणी योजनेच्या पाईपला जागोजागी असलेली गळती काढण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले. आज संपूर्ण गळती काढण्यात यश आले आहे.
प्रादेशिक योजनेतून दररोज येणाऱ्या पाण्याचे ग्रामपंचायतीमार्फत योग्य नियोजन करण्यात आले आहे. गावातील सर्व भागांमध्ये चार दिवसांतून एक ते दोन तास मुबलक पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याने गेल्या चार महिन्यांपासून प्रत्येक भागात नियमित ठरलेल्या दिवशी पाणी येत आहे.आता मार्च महिना संपत आलातरी ग्रामपंचायतीने यावेळी टँकर मागणीचा प्रस्ताव प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या योग्य नियोजनामुळे यावर्षी प्रथमच मायणीकरांचा उन्हाळा टँकरमुक्त जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच ग्रामस्थांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे गरजेचे आहे. तरच कोणावरही पाण्याचा टँकर विकत घेण्याची वेळ येणार नाही.माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या प्रयत्नातून थकीत वीजबिलाचे २१ हप्ते करून घेण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीमार्फतही हे हप्ते वेळेत वीज वितरण कंपनीला जमा करण्यात येत आहेत. त्यामुळे थकीत बिलाचा प्रश्न निर्माण होणार नसल्याने यावर्षी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहणार आहे.