सातारा : जिल्ह्यात दिवाळीलाच थंडीचे स्वागत झाले असून पारा कमी होत चालला आहे. रविवारी तर साताऱ्यात १४.०३ अंश तापमानाची नोंद झाली. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेती कामांवर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे थंडी जाणवत नाही. याउलट ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येतो. पण यंदा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतरही परतीचा पाऊस पडत होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीला उशिरा सुरुवात होईल, असे संकेत मिळत होते. पण २० ऑक्टोबरनंतर पावसाची उघडीप पडली. तर याचदरम्यान दिवाळीलाही सुरुवात झाली. तसेच वातावरणातही बदल घडून आला. त्यामुळे थंडीला सुरुवात झाली.
दरवर्षी दिवाळीपासून थंडी पडण्यास सुरुवात होते. बहुतांश वेळा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असते. यंदा तर दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आली होती. त्यामुळे थंडी नोव्हेंबरपासून सुरू होईल, असे अनुमान असतानाच ऑक्टोबरपासूनच थंडीने डोके वर काढले. सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातही थंडी वाढली आहे.
यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यातच पारा १४ अंशांपर्यंत घसरला आहे. सातारा शहराचे किमान तापमान तर मागील काही दिवसांपासून १४ ते १५ अंशांदरम्यान आहे. यामुळे शहरवासीयांना थंडीचा सामना करावा लागतोय, तर ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शेकोट्या पेटविण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकरी वर्ग दुपारच्यादरम्यान शेती कामे उरकत आहेत. सकाळी कडाक्याची थंडी असल्याने शेतीकामात बदल केला आहे.
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. १५ ऑक्टोबर २०.०५, दि. १६ ऑक्टोबर २१.०५, दि. १७ ऑक्टोबर २२.०१, दि. १८ ऑक्टोबर २०.०७, दि. १९ ऑक्टोबर २०.०२, दि. २० ऑक्टोबर २१.०८, दि. २१ ऑक्टोबर २२, दि. २२ ऑक्टोबर २१.०७, दि. २३ ऑक्टोबर १६.०७, २४ ऑक्टोबर १४.०६, २५ ऑक्टोबर १४.०१, २६ ऑक्टोबर १४.०८, २७ ऑक्टोबर १५.०१, दि. २८ ऑक्टोबर १४.०८, २९ ऑक्टोबर १५.०२ आणि ३० ऑक्टोबर १४.०३