सातारा : सातारा शहराचा पारा सतत वाढत असून बुधवारी तर ३९.९ अंशाची नोंद झाली. यावर्षातील हा उच्चांकी पारा ठरला. तर सतत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, पारा वाढल्याने सातारकर उकाड्याने हैराण झाले. दरम्यानच, सातारा शहर आणि परिसराला सायंकाळच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून ऊन जाणवत आहे. तर मार्च महिन्यात पारा ३७ अंशावर पोहोचला होता. मात्र, अवकाळी पाऊस होत असल्याने त्यावेळी तापमानात उतारही यायचा. परिणामी ऊन आणि उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत नव्हती. मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सूर्य आग ओकू लागल्याचे चित्र आहे. सतत तापमान ३६ अंशावर राहिले आहे. वळवाचा पाऊस झाला की तापमानात उतार येत आहे. पण, उकाडा कायम राहतो. त्यातच मागील तीन दिवसांपासून सातारा शहराचा पारा सतत वाढत चालला आहे. बुधवारी तर शहराचे कमाल तापमान ३९.९ अंश नोंद झाले. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. सातारा शहराचे तापमान वाढत चालल्याने दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरही तुरळक वाहने दिसत आहेत. तर बाजारपेठेतील उलाढालही मंदावली आहे. तर उन्हाची तीव्रता असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव या तालुक्यात साताऱ्यापेक्षा अधिक पारा असतो. त्यामुळे बुधवारी या तालुक्यात कमाल तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. तर काही ठिकाणी मजूर सकाळी लवकर कामाला जाऊन दुपारपर्यंत माघारी येत आहेत. मेंढपाळ वर्ग तर दुपारच्या सुमारास झाडाच्या सावलीत थांबणेच पसंद करीत आहे.सातारा शहरात नोंद कमाल तापमान...दि. १० एप्रिल ३७, ११ एप्रिल ३८.१, १२ एप्रिल ३९.३, १३ एप्रिल ३८.३, दि. १४ एप्रिल ३८.२, १५ एप्रिल ३६.२, १६ एप्रिल ३६.१, १७ एप्रिल ३७.४, १८ एप्रिल ३८.८ दि. १९ एप्रिल ३९.९
साताऱ्यात उच्चांकी तापमान, उष्माघाताचा धोका; उकाड्यातच वळीव पावसाचा तडाखा
By नितीन काळेल | Published: April 19, 2023 7:09 PM