पेट्री/सातारा : सातारा -कास मार्गावर पिसाणी फाटा ता. सातारा येथे आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पर्यटनास निघालेल्या मिनीबसचा अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले .दरम्यान तात्काळ पिसाणी गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना गाडीतुन बाहेर काढण्यास सहकार्य करून तात्काळ त्यांना उपचारासाठी सातारा येथे रूग्णवाहिकेतुन पाठविण्यात आले.सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे कास तसेच बामणोलीला फिरण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. इस्लामपूरहून युवकांचा एक ग्रुप टेम्पो ट्रॅव्हलरने वासोटा येथे फिरण्यासाठी निघाला होता. कास रस्त्यावरील पिसाणी या गावाजवळ आल्यानंतर चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सातारा शहराच्याच्या पश्चिमेस सातारा - कास मार्गावर पिसाणी फाटा येथील मोरी जवळच्या वळणावर आज सकाळी ६ वा.२० मिनिटांनी (एम. एच. १२ एफ सी ३५१६) मिनीबस उलटली.
वाहनात हवा कमी असल्याने व नियत्रंण सुटल्याने अपघात झाल्याचे वाहनचालकाने ग्रामस्थांना सांगितले. या बसमधील इस्लामपुर येथील वैदयकीय महाविद्यालयाचे विदयार्थी असल्याची माहिती मिळाली. दरम्यान अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असुन जखमींना बाहेर काढण्यास पिसाणी ग्रामस्थांनी सहकार्य करून त्यांना तात्काळ सातारा येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवल्याची माहिती पिसाणीचे सरपंच लक्ष्मण गोगावले यांनी माहिती दिली.
हा अपघात झाल्याचे समजताच सातारा तालुका पोलीस आणि शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना एका खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. काहींच्या गुडग्याला तर काहींच्या हाताला खरचटले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर मुले रुग्णालयातून निघून गेली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.