सातारा : सिगारेट आणि मोबाईल घेऊन येतो, असे म्हणून दुचाकी नेऊन डिकीतील एक लाख ४४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या तक्रारीवरून एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महेश पांडुरंग नलवडे (रा. चंदननगर, कोडोली, मूळ रा. दालवडी, ता. फलटण) असे चोरीचा आरोप असणाऱ्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २० रोजी सकाळी ११ च्या सुमारास येथील जुनी एमआयडीसीतील हेम मोटर्स शोरुमजवळ ही घटना घडली. फिर्यादी संजय दादा राजगे (वय ३१, रा. श्रीनगर कॉलनी कोडोली, सातारा) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास ते ग्राहकांना डंपरमधील वाळू दाखवत होते. त्यावेळी महेश नलवडे याने संजय राजगे यांना सिगारेट व मोबाईल आणतो, असे म्हणून दुचाकीची चावी मागितली. त्यानंतर दुचाकी घेऊन तो निघून गेला.
या दुचाकीच्या डिकीत राजगे यांच्या कारच्या व्यवहारातून आलेली एक लाख ४४ हजारांची रक्कम होती. ही रक्कम नलवडे याने नेली. त्यानंतर राजगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कदम हे तपास करीत आहेत.