सातारा : नळ कनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टंचाई काळात पाण्याची नासाडी करणाºया नागरिकांवर अंकुश लावण्यासाठी पालिकेच्या वतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी शहरात ठिकठिकाणी ही मोहीम राबवली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पाण्याचा दुरुपयोग करणाºया २२ नागरिकांना जागेवरच कारवाईची नोटीस बजावण्यात आली. तसेच चार इलेक्ट्रिक मोटारी जप्त करून तीन नळकनेक्शनही बंद करण्यात आले.सकाळी सात वाजता बोगदा परिसरातून ही मोहीम सुरू झाली. पाण्याची नासाडी करताना आढळून आलेल्या संबंधित नागरिकांवर जागेवरच कारवाई करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही जणांनी कर्मचाऱ्यांची हुज्जतही घातली. बोगदा परिसर, समर्थ मंदिर, भूतेबोळ व राजवाडा परिसरातील पाणी परिस्थितीची पथकाकडून पाहणी करण्यात आली. व्यापारी पेठेतील व्यापाºयांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना यावेळी करण्यात आली.
दरम्यान, शनिवार पेठेतील भूतेबोळ येथे राहणाºया आनंदराव सोनकर यांनी नळ कनेक्शनला मोटार लावल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ही मोटार तत्काळ काढून टाका अन्यथा जप्त केली जाईल, असा इशारा सभापती आंबेकर यांनी दिला. या प्रकारानंतर सोनकर यांनी चिडून जाऊन आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर आंबेकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सोनकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होत. झालेल्या घटनेचा सातारा विकास आघाडीकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
या मोहिमेत पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, दीपक गाढवे, नंदकुमार कांबळे, तार्केश्वर बावणे, महेश पवार, संजय घाडगे, सुदाम घाडगे व संतोष घाडगे यांनी सहभाग घेतला.तीन नळ कनेक्शन तोडलीटंचाई काळात पाण्याचा अतिरिक्त वापर करणाºया नागरिकांचे तीन नळ कनेक्शन पाणीपुरवठा विभागाच्या पथकाकडून तातडीने बंद करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असताना जर कोणी पाण्याची नासाडी करीत असेल, तर याही पुढे संबंधितांचे कनेक्शन बंद केले जातील, असा इशारा पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिला आहे.
पालिकेने सुरू केलेली ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. नळाला मोटारी लावणाºयांविरुद्ध यापुढे फौजदारी दाखल करून त्यांचे नळ कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जातील. खासदार उदयनराजे भोसले यांनीही कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.- माधवी कदम, नगराध्यक्षा.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. सातारकर पाण्यापासून वंचित राहू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे कारवाईत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल.- श्रीकांत आंबेकर, सभापती, पाणीपुरवठा