सातारा : सातारा पालिकेत नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. सध्या नगरविकास आघाडीचे नगराध्यक्ष सचिन सारस यांची मुदत १५ सप्टेंबरला संपत असून, त्यांच्या राजीनाम्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इथून पुढील सव्वा वर्षासाठी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विजय बडेकर यांच्याकडे नगराध्यक्षपदाची सूत्रे येणार आहेत.सातारा पालिकेचे नगराध्यक्षपद मागील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. यासाठी नगरविकास आघाडीतून सचिन सारस हे तर सातारा विकास आघाडीतून विजय बडेकर हे दोघे एकमेव उमेदवार होते. सुरुवातीचे सव्वा वर्ष नगरविकास आघाडीच्या सचिन सारस यांना हे पद देण्यात आले होते. आता इथून पुढे निवडणूक लागेपर्यंत विजय बडेकर यांच्याकडे नगराध्यक्षपद येणार आहे.पालिकेत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता असून, दोन्ही राजेंनी अंतर्गत तहाने पदे विभागून घेतली आहेत. त्यानुसार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदे साविआ व नविआ यांच्याकडे विभागून देण्यात आली. आता अखेरच्या सव्वा वर्षात मनोमिलनात कोणतीही कुरबूर होऊ नये, म्हणून नियोजनानुसार सातारा विकास आघाडीकडे नगराध्यक्षपद द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजेंना भेटले होते. या भेटीदरम्यान नगराध्यक्ष बदलाबाबत चर्चा झाल्याची कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.खासदार उदयनराजे भोसले यांच्या दबावाच्या राजकारणाचा अनेकदा अनुभव विविध संस्थांच्या निवडणुकांत पाहायला मिळाला असल्याने नगराध्यक्षपदासाठीही ते दबावतंत्र वापरतील, अशी चर्चा सध्या शहरात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)नव्या नगराध्यक्षांना किती कालावधी? सातारा विकास आघाडीच्या सुजाता राजेमहाडिक यांनी एक महिना अधिक काळ नगराध्यक्षपद सांभाळले होते. त्यामुळे ‘नविआ’लाही एक महिना अधिक काळ मिळाला पाहिजे, अशी या आघाडीची मागणी असली तरी पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पालिकेची निवडणूक असल्याने त्याची आचारसंहिता साधारण दीड महिना आधी लागणार असल्यामुळे नेमके किती दिवस काम करायला संधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साताऱ्यात नगराध्यक्ष बदलाचे वारे!
By admin | Published: September 02, 2015 9:48 PM