आॅनलाईन लोकमत
सातारा : विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही म्हणून निषेध करणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकाचा गळा धरून चक्क ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार सातारा पालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी घडला. आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेवक अशोक मोने यांच्यातील धक्काबुक्कीनंतर सभेचे कामकाज थांबविण्यात आले.
पुरुषांपेक्षा महिला नगरसेवकांचीच अधिक उपस्थिती असणा ऱ्या आजच्या सभेत सुरुवातीला भाजपच्या सदस्यांनी आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सेवकाला सांगून माईकचा आवाज बंद करायला लावला. त्यानंतर भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी स्वत: उठून हा आवाज वाढविला. सभागृहात जोरजोराने आवाज घुमू लागल्यामुळे काही सत्ताधारी मंडळी संतप्त झाली.
याच गोंधळात बहुमताने सर्व ठराव मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाचे नगरसेवक अशोक मोने तावातावाने बोलू लागले, तेव्हा आरोग्य सभापती वसंत लेवे त्यांच्या अंगावर धावून गेले. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता धक्काबुक्की सुरू झाली. रागाच्या भरात लेवे यांनी मोने यांच्या शर्टाची कॉलर धरून त्यांना ढकलून दिले. त्यानंतर सभेचे कामकाज थांबविले गेले. सभा संपल्यानंतर शिवेंद्रराजे गट तसेच भाजपच्या नगरसेवकांनी सभेतील गुंडगिरीचा निषेध केला.