सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बळींची संख्या वाढत चालली असून, माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व्यवस्थेवर ताण पडला आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार स्मशानभूमीत उपलब्ध वीस अग्निकुंडाव्यतिरिक्त स्वतंत्र चार अग्निकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली .
बळींचे वाढते प्रमाण आणि अग्निकुंडांची कमतरता यामुळे अग्निसंस्काराच्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. अंत्यसंस्कार व्यवस्थेची जबाबदारी सातारा पालिकेकडेच असून, आरोग्य विभागाचे बावीस कर्मचारी तीन सत्रात सातत्याने उपलब्ध आहेत. सातारा पालिकेने हे काम अत्यंत नेटाने चालविले आहे.
उदयनराजे भोसले यांनी अंत्यसंस्कार व्यवस्थेवरील हा ताण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांनी कैलास स्मशानभूमीत स्वतंत्र चार अग्निकुंड संपूर्ण व्यवस्थेसह बसविण्याचे पालिका प्रशासनाला आदेशित केले आहे. त्यानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तत्काळ कैलास स्मशानभूमीला भेट देऊन यंत्रणा कामाला लावली.
सध्या स्मशानभूमीत वीस अग्निकुंड आहेत. पैकी दहा अग्निकुंड कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव आहेत. मात्र कोरोना बळीचा आकडा पन्नाशीच्या दिशेने निघाल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत राहणे आणि शिवाय कुटुंबीयांना मनस्ताप असे अनुभव सध्या येत आहेत. याच गैरसोयीवर जादा अग्निकुंड बसविण्याचा तोडगा उदयनराजे यांनी काढत तो तत्काळ अंमलात येईल याची व्यवस्था केली आहे.
चौकट-
कैलास स्मशानभूमीसाठी स्वतंत्र गॅसदाहिनी बसविण्याची योजना सातारा पालिकेने आखली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी नगरोत्थान योजनेअंर्तगत मुबलक निधी उपलब्ध होणार आहे. पालिका या कामाची निविदा प्रसिद्ध करणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.