शेखर जाधववडूज: शहरातील कचरा संकलन केंद्र हलवून काही महिने लोटण्यापूर्वींच कचरा संकलन केंद्रामध्ये आगीचा भडका उडाला. आगीची माहिती समजताच नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि काही तासांतच म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे कोणतीही ही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात धुराच्या लोढ्यांने प्रदूषण वाढले.नगरपंचायत स्वमालकीच्या जागेतील पूर्वीचे कचरा संकलन केंद्र लोकवस्ती शेजारी असलेल्या जागेत होते. कचरा निर्मूलन, बायोमायनिंगबाबत नगरपंचायतीची उदासीनता या कारणाने कचरा जास्त साठत होता. त्याठिकाणी सर्वच प्रकारचा कचरा साठल्याने ढिगारे निर्माण झाले होते. प्रसंगी त्याठिकाणी अचानक लागलेल्या आगीमुळे धुपत असलेल्या कचऱ्यामधून धुरांचे लोंढे दोन-तीन दिवस परिसरातील नागरिकांचे जिणे मुश्कील करायचे. त्याकारणाने तेथील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या तक्रारीमुळे त्या जागेतून कचरा संकलन केंद्र हलवून भाडेतत्त्वावरील जागेत हे संकलन केंद्र हलविले. परंतु शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील या संकलन केंद्राजवळ हिंगणे गाव आणि शहरातीलच लोकवस्ती तुरळक आहे. हे संकलन केंद्र सुरू झाल्यापासून हिंगणे ग्रामस्थांनी तहसीलदार, नगरपंचायत प्रशासनाला हे केंद्र हलविण्यासाठी लेखी निवेदन देऊन ही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. कुबट वास व मांसल पदार्थाचे खरकटे या कचरा संकलन केंद्रामध्ये समाविष्ट होत असल्याने मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट या परिसरात दहशत निर्माण करीत आहे. या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गत महिन्यात एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या दावणीला असलेली तीन बकऱ्या मरण पावल्या होत्या. यावर हिंगणे ग्रामस्थांनी न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील या संदर्भात लेखी निवेदन देऊन गर्भित इशाराही दिला होता.हा साचलेला कचरा बायोमायनिंग करण्यासाठी आजच पुणे येथील वाहने येऊन घेऊन जाणार होती. परंतु तत्पूर्वीच कचरा संकलन केंद्रामध्ये आग लागून सर्वच कचरा बेचिराख झाला. घटनास्थळी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी धडपड सुरू आहे. तर नेमकी ही आग लागली की लावली हा विषय अनुत्तरित आहे.
Satara News: वडूज कचरा संकलन केंद्रात आगीचा भडका, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
By जगदीश कोष्टी | Published: February 27, 2023 4:38 PM