सचिन काकडे
सातारा : सैन्यदलात असलेल्या पतीचं २१ वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून त्यांना ना कधी हळदी - कुंकवाचा मान मिळाला, ना कोणत्या धार्मिक कार्यात मानाचं स्थान. मात्र, मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी त्यांना ‘सौभाग्याचं लेणंं’ पुन्हा बहाल केलं.
कोरेगाव तालुक्यातील रुई गावचे सुपुत्र सुनील सावंत यांना २१ वर्षांपूर्वी हौतात्म्य आले. पतीनिधनानंतर नीता सावंत यांनी कोंडवे (ता. सातारा) हे आपलं माहेर गाठलं. येथे राहूनच त्यांनी मुलीचं संगोपन केलं.
मुलीला पाहून आई नि:शब्द...
पती शहीद झाल्यानंतर नीता कोंडवे येथे आपल्या माहेरी राहू लागल्या. तेव्हापासून त्या विधवा म्हणूनच जीवन जगत आहेत. मात्र, जय हिंद फाउंडेशनमुळे २१ वर्षांनंतर त्यांच्या भाळी हळदी-कुंकू अन् हातात हिरवा चुडा पाहून त्यांची आईदेखील नि:शब्द झाली.
विधवा प्रथामुक्तीकडे पाऊल
जय हिंद फाउंडेशनने विधायक उपक्रम राबवून परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या अनोख्या उपक्रमाचे रुई ग्रामपंचायतीने काैतुक केले आहे. तसेच गावात विधवा प्रथा मुक्ती करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
सुनेने व्यक्त केली इच्छा; सासरच्यांनी दिला मान
मुलीने ८ डिसेंबरला कोंडवेतील ननावरे कुटुंबात सून म्हणून गृहप्रवेशही केला. मात्र, लग्नाच्या पूर्वी सर्व विधी आईनेच कराव्यात, अशी इच्छा सासू संगीता व सासरे अवधूत ननावरे यांनी व्यक्त केली होती. लग्नाचा पहिला विधी म्हणजे मुहूर्तमेढ आणि घाणा भरणे. हा विधी नीता सावंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमातच त्यांना हळदी-कुंकवाचा मान देण्यात आला. हातात हिरवा चुडा भरण्यात आला.
nवीरपत्नी व वीरमातांना सौभाग्याचं लेणं मिळवून देण्यासाठी जय हिंद फाउंडेशन राबवत असलेल्या या उप्रकमाचे नागरिकांनी कौतुक केले.