सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असून, निर्यातबंदी उठविल्यापासून दरातही वाढ होत आहे. रविवारी क्विंटलला एक हजारापासून ३३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. निर्यातबंदी उठल्यानंतर जवळपास एक हजार रुपयाने दर वाढला आहे, तर शेवग्याचा दर तेजीतच असून, वाटाणा आणखी स्वस्त झाला आहे. तसेच कोबी अन् फ्लॉवरचा दर वाढतच चालला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होते.
सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ८४६ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये कांद्याची ११० क्विंटलची आवक झाली. यावेळी वांग्याचा दर थोडा वाढल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २८० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर या आठवड्यातही शेवग्याचा दर तेजीत निघाला. ७०० ते ८०० रुपये १० किलोला मिळाले.
तेलाचे दर स्थिर
मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मात्र, या आठवड्यात तेलडब्याचा दर स्थिर राहिला. १५ किलोचा शेंगदाणा तेल डबा २४०० ते २५०० रुपयांपर्यंत मिळत आहे. पामतेल १७०० ते १८००, सोयाबीन २००० ते २०५०, सूर्यफूल तेल डबा २००० ते २०५० पर्यंत मिळत आहे. तर लीटरमागे सरासरी २ रुपये वाढ आहे.
बोराची आवक चांगली
साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे दरात फारशी सुधारणा नाही. बोरांची आवक अधिक आहे. २० रुपये किलोपासून बोरे होती.
आले स्वस्त
काही भाज्यांच्या दरात वाढ झाली. गवार १० किलोला ३५० ते ४५० रुपये दर मिळाला. दोडका १५० ते २००, कोबी १०० ते १५० रुपये, कारली १५० ते २००, टोमॅटोला ३० ते ५० रुपये दर १० किलोला मिळाला. आले स्वस्त असून, क्विंटलला एक हजारपासून १८०० पर्यंत भाव मिळाला.
सध्या काही भाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. विशेषकरून कोबी अन् फ्लॉवरच्या दरात अनेक दिवसांनंतर प्रथमच वाढ झाली आहे. तसेच मेथी व कोथिंबीरचा भावही वाढला आहे.
- नारायण काळे, ग्राहक
देशात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. सध्या परदेशातून आवक कमी आहे. यामुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. या आठवड्यात तेल डब्याचा दर स्थिर राहिला. तर पाऊचमागे थोडीशी वाढ झाली.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक चांगली आहे. तरीही कोबी, फ्लॉवरला दर चांगला मिळाला. मात्र, टोमॅटोचा भाव कमी झाला आहे. आल्याला अजूनही चांगला दर मिळत नाही.
- रामचंद्र पाटील, शेतकरी