कोरेगाव : एसटी महामंडळाने गाजावाजा करत शिवशाही बसेसचे उदात्तीकरण केले. लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येते. त्यामुळे जुन्या निमआराम बसेस ग्रामीण भागातील आगारांना मुक्तहस्ताने दिल्या. प्रवाशांना नाईलाजास्तव महागडा प्रवास करावा लागत आहे. निमआराम बसेसमुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.कोरेगाव, वडूज व दहिवडी आगार अनेक वर्षांपूर्वी महामंडळाने या आगारातून निमआराम बसेस लांब पल्ल्यासाठी सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार म्हसवड-मुंबई, वडूज-मुंबई, कोरेगाव-मुंबई, कोरेगाव-स्वारगेट व सातारा-हैद्राबाद मार्गावर निमआराम बसेस धावत होत्या. मात्र प्रवासी उत्पन्न कमी येत असल्याचे कारण दाखवून त्या वेळोवेळी बंद देखील केल्या होत्या.साताऱ्यातून थेट स्वारगेट, मुंबई व बोरीवलीसाठी दर तासाला विनावाहक-विना थांबा निमआराम बससेवा सुरू झाली. त्यानंतर कोरेगाव, वडूज व दहिवडी आगारांतील लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. साताºयातून थेट सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांनी कधीही तक्रारी केल्या नाहीत.सध्या महामंडळाने शिवशाही बसेस आणल्या आहेत. साताऱ्यातून थेट स्वारगेट, मुंबई व बोरीवलीसाठी शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत. कऱ्हाड व महाबळेश्वर आगारातूनही लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत. शिवशाही बसेस ताफ्यात आल्याने सातारा व महाबळेश्वर आगारातील निमआराम बसेस ग्रामीण आगारांना दिल्या.एकट्या कोरेगाव आगाराला तब्बल सात बसेस दिल्या आहेत. सातारा-सोलापूर मार्गावर हैद्राबाद बसचा अपवाद वगळता कधीही निमआराम गाडी धावली नाही. मात्र आता साताऱ्यासह सोलापूर विभागाच्या विविध आगारांच्या निमआराम बसेस या मार्गावर धावत असल्याने प्रवाशांना महागडा प्रवास करावा लागत आहे.
कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदारांना तर निमआराम बसेस शिवाय पर्याय उरत नसल्याने अनेकांची पावले आता खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळू लागली आहेत. दीडपट तिकीट असल्याने अनेकजण निमआराम बसेस सोडून साध्या बसेसची वाट पाहत थांब्यावर थांबत असल्याचे चित्र आहे.कोरेगावातील व्यापारी नाराजकोरेगाव-स्वारगेट मार्गावर निमआराम बसेस धावत असतात. सकाळी सहा वाजता सुटणाऱ्या बसला नेहमी गर्दी असते. कोरेगावातील व्यापारी पुण्यातील खरेदीसाठी जाताना या बसचा वापर करतात. काही दिवसांपासून निमआराम बस या मार्गावर सोडली जात असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.