सातारा: बैलगाडी शर्यतीस बंदी असतानाही स्पर्धेचे आयोजन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.समीर सतीश अहिरेकर, प्रदीप नारायण जाधव, राहुल अरूण जाधव, अमर पांडुरंग घाडगे, संतोष गोविंद जाधव (सर्व रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, तामजाई देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दि. २८ रोजी क्षेत्र माहुली येथील हरणमाळ या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा सुरू असतानाच पोलिसांना याची खबर लागली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून स्पर्धा थांबविल्या.
शर्यतीचे आयोजन करणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संशयितांना कायदेशीर नोटीसाही पोलिसांनी दिल्या.बैलगाडी शर्यतीस बंदी असतानाही बेकायदेशीरपणे आयोजन करून बैलांना निर्दयतेची वागणूक देऊन मारहाण केली, असा ठपका वरील पाचजणांवर ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर ११९ कलमान्वये (प्राण्यांचा छळ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार खुडे हे करत आहेत.