नितीन काळेलसातारा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढण्याने सुमारे सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे.खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावाने पाणीदार होण्याचे ठरविले आहे. त्यातूनच करुंज बेंद नावाच्या पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू झालं आहे. शासनाची गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना त्यासाठी फायदेशीर ठरली आहे. अनुलोमच्या माध्यमातून गावातील तलावातील गाळ काढण्यात येत आहे. अनुलोमचे जनसेवक श्रेयस काणे आणि सामाजिक कार्यकर्ते मेघराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.मे महिन्याच्या ऐन उन्हाळ्यात तलावातील गाळ काढणीस प्रारंभ झाला. त्यावेळी तलावातील गाळ हा १०० टक्के काळं सोनं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर हा गाळ शेतकऱ्यांनी जवळच्या माळरानावर पसरवला. ज्या ठिकाणी जनावरे चरत होती, अशा सुमारे ५० एकर क्षेत्रावर गाळ टाकण्यात आला.
यामुळे ३० हून अधिक शेतकऱ्यांच्या माळरानाचे आता बागायती क्षेत्रात रुपांतर होत आहे. तर आतापर्यंतच्या २३ दिवसांत सुमारे ३ हजार डंपर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे.
तलावातून दररोज सरासरी १७५ डंपर गाळ काढण्यात येत असून, पोकलेन मशीनसाठी शासनाच्या वतीने इंधन पुरवठा करण्यात येत आहे. तर गाळ वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या कामाच्या ठिकाणी सहा डंपर, दोन पोकलेन कार्यरत असून, पाऊस नाही पडला तर किमान तीन महिने हे काम चालणार आहे.तलावात वीस फुटांवर होता गाळगावाची लोकसंख्या सुमारे ६००गावातील ऐकूण क्षेत्र १६०० हेक्टरतलावाची निर्मिती १९७० च्या दरम्यानतलावात २० फुटाच्यावर गाळ साठलेलानवीन जमिनीत तीन फूट गाळाचा थर
गाव तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. त्यामुळे किमान सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे. परिसरातील शेकडो एकर क्षेत्राला फायदा होणार आहे.- भगवान भोसले,माजी सरपंच