सातारा : येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू झालेल्या मानिनी जत्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत सुमारे २० लाखांच्यावर उलाढाल झाली आहे. येथे राज्यातील स्टॉल आले असून औरंगाबादची पैठणी, जालनाची आवळा कँडी अन सातारची नागली आणि नाचणी बिस्कीटं महत्त्वपूर्ण ठरू लागली आहेत.येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शनिवारी मानिनी जत्रेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता गटाने निर्मित वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आणि राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.या मानिनी जत्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील सुमारे २०० स्टॉलवर कमी-अधिक फरकाने खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. येथे गारमेंटस, लहान मुलांची खेळणी, लोणचे, चटणी, कडधान्ये, पुस्तके, पूजा साहित्य, बिस्कीटस, मणुके, आयुर्वेद शतावरी, ज्वेलरी, गव्हाचे पदार्थ, तांदूळ, खाऊचे पदार्थ असे विविध स्टॉल आहेत.
यामध्ये विशेष करून औरंगाबादची पैठणी, जालनाची आवळा कँडी, साताऱ्याची नागली आणि नाचणीची बिस्कीटस, सेंद्रिय गूळ पावडर, दिव्यांगांचा चॉकलेटचा स्टॉल, जळगावचे पापड याकडे ग्राहकांचा अधिक ओढा दिसून येत आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी सातारकर येऊन खरेदीचा आनंद घेत आहेत. पहिल्या दिवशी सुमारे दहा लाख तर रविवारी दुसऱ्यादिवशी दहा लाखांहून अधिक रुपयांची खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.
पाच दिवस विविध कार्यक्रम...शनिवारी मानिनी जत्रा सुरू झाली आहे. ती पाच दिवस चालणार आहे. या पाच दिवसांत येथे येणाऱ्या ग्राहक आणि बचत गटातील स्टॉलधारकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मनोरंजनाबरोबरच मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचाही समावेश आहे. दररोज सायंकाळच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे.