सातारा : वाढत्या शहरीकरणात प्रत्येक घरात दोन या हिशेबाने रस्त्यांवर गाड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याच गतीने शहरातील व्यावसायिकांचे विक्रीचे साहित्यही रस्त्यावर थाटात विराजत आहे.
पार्किंगला दिली ओसरी... दुकानदार तिथेही साहित्य पसरी. अशी काहीशी अवस्था सध्या शहरातील रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. अतिक्रमणाच्या या शकलीवर पालिकेने तातडीने उपाय करून या व्यापाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची आवश्यकता आहे.साताऱ्याच्या बाजारपेठेतील रस्त्यावरून सकाळी आणि संध्याकाळी गडबडीचा प्रवास करणं दिवसेंदिवस अशक्य ठरत आहे. या रस्त्यावरील अनेक दुकानांचे नूतनीकरण किंवा नवीन बांधकाम झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल, अशी आशा सातारकरांना होती. मात्र, बांधकाम झाल्यानंतर व्यावसायिकांनी नामी शक्कल लढवली.
नवीन बांधकाम केलेल्या बहुतांश व्यावसायिकांनी रोड मार्जिनसाठी सोडलेल्या जागेचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली आहे. कोणी दुकानाचे साहित्य मांडले, तर कोणी पार्किंगची व्यवस्था केली, कोणी त्या जागेवर छत टाकले तर कोणी सिक्युरिटीच्या बसायची व्यवस्था केली.व्यावसायिकांच्या या हुशारीमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहेत. निम्मे दुकान रोड मार्जिनवर मांडून हे व्यावसायिक त्या जागेचा पुरेपूर वापर करत आहेत.