- दत्ता यादव सातारा- महाबळेश्वर येथे दुर्गादेवी मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाला. यामध्ये आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
महाबळेश्वरातील दुर्गा उत्सव समिती कोळी आळी येथे दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीमध्ये लहान मुले सुद्धा सहभागी झाली होती. वाजत -गाजत देवीची मिरवणूक सुरू असताना अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या आजूबाजूला असलेली लहान मुले व मुली यात भाजून गंभीर जखमी झाली. कोणाचे तोंड तर कोणाची पाठ भाजली आहे. ही सर्व मुले व मुली आठ ते दहा वयोगटातील आहेत. जखमी झालेल्या सर्व मुलांना वाहनाने तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दुर्गा देवीची मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्याचा निर्णय दुर्गा उत्सव समितीने घेतला आहे. या घटनेमुळे महाबळेश्वरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.