सातारा - गेल्या चार दिवसांपासून परळी खोºयात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरडींचे दगड कोसळणे आणि ते रस्त्यावर येण्याचे प्रकार सुरू आहेत. साताºयाकडून ठोसेघरकडे जाताना सज्जनगडाजवळ रस्त्यावरच झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ बंद झाला होता. नागरिक आणि बांधकाम विभागाने रस्त्यावरील झाडे बाजुला केल्याने हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
जोरदार पावसामुळे ठोसेघर धबधबाही कोसळू लागला आहे. त्यामुळे ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी जाणाºया लोकांची संख्या वाढली आहे. त्याबरोबरच सज्जनगडावरून उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य दिसते. यासाठीही पर्यटक या रस्त्यावर गर्दी करतात. मात्र, या रस्त्यावरून जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक दगड मूळ जागेपासून सुटलेले आहेत. त्यामुळे ते कधीही ढासळू शकतात. याची शक्यता बाळगूनच या काळात प्रवास करणे सुरक्षित ठरेल.