सातारा : परिचारिका महाविद्यालयाच्या पेपरला अवघे अडीच तास उरले असताना विद्यार्थिनीचा अपघात झाला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली असतानाही तिने डॉक्टरांकडे पेपरला सोडण्यासाठी याचना केली. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी पेपरला जाण्यासाठी तिला स्पष्ट नकार दिला.प्रतीक्षा आत्माराम पवार (वय २३, रा. जखीणवाडी ता. कऱ्हाड) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक्षा ही पाचवड येथील नर्सिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता तिचा पेपर होता. त्यासाठी ती ओळखीच्या मुलासोबत दुचाकीवरून पेपरला निघाली होती.
दरम्यान, उडतारे ता. वाई गावच्या हद्दीत पुलाजवळ अचानक त्यांची दुचाकी घसरल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यामध्येप्रतीक्षाच्या डोक्याला, डोळा आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. तर मुलगा गणेश डुबल (वय १४, रा. अमर लक्ष्मी बसस्टॉप, कोडोली) हाही यामध्ये गंभीर जखमी झाला. रुग्णवाहिकेने या दोघांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.प्रतीक्षाच्या डोळ्याच्या वरील भागातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. परंतु डोक्याला जबर मार लागल्याने सीटी स्कॅन करणे गरजेचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलविले. परंतु नातेवाईक कऱ्हाडवरून येणार असल्याने बराचवेळ लागणार होता. त्यातच प्रतीक्षाने मला पेपरला जायचे आहे, असा आग्रह डॉक्टरांकडे धरला.
डोक्याला जबर मार लागल्याने पेपरला जाता येणार नाही, असे डॉक्टरांनी तिला सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. शनिवारी दुपारी दोन वाजता तिचा पेपर होता. तत्पूर्वीच अपघात झाल्याने तिला पेपरला मुकावे लागले आहे.