सातारा : मी महिलांचा सर्वाधिक सन्मान करणारा माणूस आहे. तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा महिलांचा प्रश्न आणून मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट सुरू आहे. सोशल मीडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली असून, ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. या दिलगिरीनंतर सर्व बांधवांनी क्रिया-प्रतिक्रिया थांबवाव्यात, असे आवाहन उपराकार लक्ष्मण माने यांनी केले.येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने पुढे म्हणाले, कुत्र्याला मारायचे असेल तर ते पिसाळलं आहे, असं आधी म्हणा; मग त्याला गोळी घाला, अशी व्यवस्थेनं माझी अवस्था केली आहे.
मी महिलांचा सन्मान करणारा माणूस आहे. आताही तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा महिलांचा प्रश्न आणून मला बदनाम करण्यात येत आहे. मी माझ्या भाषणात मराठा हा शब्द वापरलेला नाही. तरीही सोशल मीडियाने माझा बकरा केला आहे.
मी बोललो नाही त्या विधानाची मोडतोड करून सर्व प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. कारण, माझ्या बदनामीचा हा एक प्रकार आहे.यासंबंधी मी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर म्हणणे मांडले आहे. ज्या मित्रांनी माझ्या जीवाला धोका निर्माण केला. ज्यामुळे मला पोलीस संरक्षणात राहावे लागत आहे. ठार मारण्याच्या रोज धमक्या येत आहेत. यासाठी जे मित्र जबाबदार आहेत, त्यांच्यावरती फौजदारी व अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करणार आहे, असेही माने यांनी यावेळी सांगितले.शिवराम ठवरेंवर आरोप...या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुमचे हितशत्रू कोण, त्याचे नाव काय ? असा प्रश्न केल्यावर माने यांनी शिवराम ठवरे यांचे नाव सांगितले. तसेच ठवरे हे साताऱ्याचेच असून, त्यानेच माझा नंबर व्हायरल केला. मी त्याच्याविरोधात फौजदारी व अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणाार आहे, असेही यावेळी माने यांनी सांगितले.